23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीत ६ जागांमुळे जोरदार घमासान

महायुतीत ६ जागांमुळे जोरदार घमासान

तिन्ही पक्षांकडून दावे?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजपने ३० पेक्षा अधिक जागांवर लढण्याची तयारी केल्याने मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा करतील. महायुतीत अद्यापही लोकसभेच्या ६ मतदारसंघांवरून जोरदार रस्सीखेच आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमधील तीन पक्षांमध्ये सध्या सहा मतदारसंघांवरून घमासान आहे. वाटाघाटींमध्ये तिन्ही पक्ष एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नाशिक, परभणी, शिरूर आणि सातारा या सहा जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. आज होणा-या बैठकीत हा विषय निकाली निघू शकतो. भाजप स्वत:कडे ३० ते ३२ जागा ठेवून शिवसेनेला ११ ते १२ आणि राष्ट्रवादीला ४ ते ५ जागा देऊ शकतो.

भाजपने छत्रपती संभाजीनगर आणि साता-यावर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी शिरूर, परभणी लढवण्यास उत्सुक आहे. नाशिक आणि संभाजीनगरसाठी शिवसेना आग्रही आहे. २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या उदयनराजेंचा पराभव केला. इथे भाजप उदयनराजेंना पुन्हा तिकिट देण्याच्या तयारीत आहे.
नाशिकमध्ये शिंदेसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. या मतदारसंघावर भाजप, राष्ट्रवादीचा डोळा आहे. परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव खासदार आहेत. हा मतदारसंघ मिळाल्यास आपल्याकडे तुल्यबळ उमेदवार असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. शिरूरवर अजित पवारांनी दावा सांगितला आहे. शरद पवारांसोबत असलेल्या खासदार अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा चंगच अजित पवारांनी बांधला आहे.

गडचिरोली लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. इथे भाजपचे अशोक नेते विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपच्या तिकिटावर लढावे, अशी ऑफर त्यांना देण्यात आली. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ भाजपकडे मागितला. आम्हाला उमेदवार द्या, पण जागा सोडणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली.

छत्रपती संभाजीनगरात पाच वर्षांपूर्वी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. त्यांनी सेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. युतीत हा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिला. पण पक्षफुटीनंतर इथली समीकरणे बदलताना दिसत आहेत. शिंदेसेनेसोबतच भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना इथून उमेदवारी देण्यास भाजप उत्सुक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR