पुणे : राज्यातील वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारांचाही पाऊस झाला आहे. काल (रविवारी) संपूर्ण राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट दिला होता. आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. अकोला, बुलडाणा, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यासह पालघर, मुंबई, ठाणे रायगड या भागातही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्याच्या अनेक भागात आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवातही झाली आहे. मंगळवारपासून पावसाचा जोर पुन्हा कमी होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे.
तर नैऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वा-यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वा-यांची स्थिती तयार होत असून, या वा-याच्या प्रभावामुळे येत्या सोमवारी (ता. २७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच बुधवारपर्यंत (ता. २९) त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात आज बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली असून, किमान मध्येही वाढ कायम आहे. विदर्भात मात्र गारठा वाढल्याचे चित्र आहे.