नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदींमध्ये कोणताही दुरावा नसल्याचे म्हटले आहे. मोदी अनेक चांगली कामे करतात आणि पाठिंबा देतात, असा दावा देखील भय्याजी जोशी यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) असलेले नाते खोलवर रुजलेले आहे. भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसचे सदस्य म्हणून, मोदींची विचारसरणी आणि नेतृत्वशैली आरएसएसच्या तत्वांनी आकाराला आली आहे. अलीकडेच, नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनून मोदी यांनी इतिहासात नोंद केली आहे. त्यानंतर संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच संघ आणि मोदी यांच्यातील दुरावा वाढला असल्याच्या बातम्या केवळ मीडियामध्येच असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाबद्दल सुरेश भय्याजी जोशी म्हणाले की, कालचा कार्यक्रम सुव्यवस्थित होता आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत. पंतप्रधानांना नेहमीच सेवेत रस आहे, जो आम्ही अनेक वर्षांपासून पाहत आहोत. कोविड-१९ च्या काळातही त्यांनी अशा उपक्रमांना चालना दिली होती. त्यांचा दौरा आणि पायाभरणी समारंभ माधव नेत्रालयाला आणखी उंचावेल असा माझा विश्वास असल्याचा दावा देखील त्यांनी केला.