कौसडी : अनेक ठिकाणी आई-वडिलांचा सांभाळ करण्यास मुले दुर्लक्ष करीत आहेत. अशा मुलांनी कितीही परमार्थ केला तरी त्यांना परमार्थात जागा मिळू शकत नाही, असे मत हभप बाळू महाराज गिरगावकर यांनी व्यक्त केले.
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी दि.२ डिसेंबर रोजी गिरगावकर महाराज म्हणाले की, कितीही संपत्ती कमावली दान केली. परंतू आई वडिलांचा सांभाळ केला नाही तर काहीच अर्थ नाही. यासाठी प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कौसडी येथे गेल्या २९ वर्षापासून ग्रामस्थांच्या वतीने या अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथेचे आयोजन केले जाते.
यानिमित्त आज शनिवारी सकाळी गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी परिसरातील ४० ते ५० गावातील ग्रामस्थांनी आपली हजेरी लावली होती. या ठिकाणी दररोज नामवंत महाराजांचे कीर्तन संपन्न झाले. सांगता प्रसंगी २० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौसडी येथील खाजगी वाहतूकदार संघटनेच्या वतीने सकाळ पासून मोफत प्रवासी वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीसाठी गावातील ४० गाड्यांचा समावेश होता.