पुणे :‘संपूर्ण राज्यात १५ ऑगस्टपासून मोफत औषध आणि उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी बा रुग्ण विभाग (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभाग (आयपीडी) यातील रुग्णांची संख्या तिप्पट वाढली.
त्यामुळे साहजिकच संबंधित केंद्रात महिनाभर पुरणारा औषधांचा आणि सलाईनचा साठा आठवड्यातच संपायला लागला. त्यामुळे जिल्हा स्तरावर तातडीने औषध खरेदीचा आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला असून ती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात आता औषधांचा किंवा सलाइनचा तुटवडा नाही,’ असे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमात सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. ‘राज्यात औषधे कमी पडत आहेत, असा एकही अहवाल माझ्यापर्यंत पोचलेला नाही.’असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आरोग्य खात्यातील संचालकांच्या रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,‘आरोग्य खात्यातील संचालकपदाची जाहिरात तयार आहे. २०१२ पासून आरोग्य विभागाची बिंदूनामावली तयार नव्हती. तीन महिन्यापूर्वी ंिबदूनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ती लवकरच पूर्ण होईल. संचालकपदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांत ती पदे भरली जातील.’
अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना दोषी ठरवून पदमुक्त केले आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.