सोलापूर : अनगरला अप्पर तहसील कार्यालय मंजूर असून अनगर येथे कार्यालय सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पुढाकार घेणार आहे. कार्यालयाला विरोध सुरू असून हा विषय आता मुख्यमंत्र्यांसमोर गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी अप्पर तहसील कार्यालयाला तात्पुरती स्थगिती दिली असून याबाबत जिल्हाप्रशासनाला माहिती नाही. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विचारले असता त्यांनी शासनाकडून स्थगितीसंदर्भात कोणतेही आदेश मिळालेले नाहीत असे सांगितले.
जोपर्यंत शासनाकडून स्थगितीसंदर्भात अधिकृत आदेश येणार नाही, तोपर्यंत स्थगितीची कार्यवाही होणार नाही. त्यामुळे पूर्वीच्या आदेशाप्रमाणे अनगरला आम्ही अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरू करणार आहोत, त्यानुसार पदांची निर्मिती करू असेही त्यांनी सांगितले. अशी माहितीदेखील जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील तहसीलदारांशी चर्चा करून जिल्हाधिका-यांनी अनगर येथे उपलब्ध जागा किंवा इमारत नवीन अपर तहसील कार्यालयासाठी कार्यान्वित करावी, अप्पर कार्यालयासाठी मोहोळ तहसीलदार व पुणे विभागातून एक अप्पर तहसीलदार, एक नायब तहसीलदार, एक अव्वल कारकून, तसेच चार महसूल सहायक लिपिक अशी एकूण सात पदे उपलब्ध करून द्यावीत अशी सूचना उपसचिवांच्या पूर्वीच्या आदेशात केली. नवीन पदांची नियुक्ती होईपर्यंत मोहोळ तहसील कार्यालयातील सात अधिकारी व कर्मचारी नवीन अप्पर तहसील कार्यालयात कार्यरत राहतील असे पूर्वीच्या आदेशात म्हटले होते.