31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमनोरंजनसमाजावर कुठलाही वाईट परिणाम होऊ नये

समाजावर कुठलाही वाईट परिणाम होऊ नये

‘फुले’ चित्रपटाच्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. आधी ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला, त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्यातील काही संवाद आणि दृश्यांवर कात्री चालवली. या चित्रपटाबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपट कोणताही असो, त्याचा समाजावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही, याची काळजी सरकार म्हणून आम्हाला घ्यावी लागते असे ते म्हणाले. ‘फुले’ हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे. यामध्ये ‘स्कॅम १९९२’ वेब सीरिज फेम प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.

आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जेव्हा महाराष्ट्रात एखादा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा आधी सेन्सॉर बोर्ड तो चित्रपट बघतो. अनेक मान्यवर सेन्सॉर बोर्डाच्या समितीमध्ये आहेत. साधारणपणे त्या चित्रपटाचा समाजावर कुठलाही वेगळा परिणाम होणार का, वाईट परिणाम होणार का हे सर्व पाहिले जाते, त्याची शहानिशा केली जाते. तुम्हालाही माहीत आहे की आजवर वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आले. ज्यावेळी ‘पद्मावत’ हा चित्रपट आला होता, त्यावेळीही अशाच प्रकारची चर्चा झाली होती.

चित्रपटाचे नाव आधी ‘पद्मावती’ होते, नंतर ते ‘पद्मावत’ केले आणि तो प्रदर्शित करण्यात आला. तरीदेखील काही घटकांचा त्याला विरोध होता. आपल्या संविधानाने, आपल्या घटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यानांच आपापले मतस्वातंत्र्य दिले आहे, विचारस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे लोकं बोलतात. परंतु सरकार म्हणून आम्ही काळजी घ्यायची असते की त्यातून समाजात कुठलाही तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये एकोपा राहील. याची खबरदारी आम्ही घेतो असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR