सोलापूर : माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहका-यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवीतावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिली. तसेच, हा माझ्या एकट्यावर झालेला हल्ला नाही, कारण मी गेल्या ३० वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करत आहे, हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे असेही प्रवीण गायकवाड यांनी म्हटले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना आज अक्कलकोट येथे काळे फासण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर, घडलेल्या घटनेवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना सरकार आणि गृह खात्याला जबाबदार धरले आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली. येथील शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून हे काळे फासण्यात आले. यावेळी मोठा राडाही झाला होता, पोलिस आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आता, आपल्यावरील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया देताना थेट सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, हा माझ्यावर नाही तर पुरोगामी विचारांवर हल्ला आहे असेही त्यांनी म्हटले.
ही शेवटाची सुरुवात आहे
शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काळे वंगण तेल टाकले, माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जी विचारधारा आहे, डॉ. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर यांचा खून झाला. गौरी लंकेश यांचाही खून झाला, सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. कधी पक्ष फोडले जातात, पक्षानंतर कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला विचार आहे. संभाजी ब्रिगेडचा काम चालूच राहणार आहे, पण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी याचा निषेध करणार नाही. मात्र, ज्यांनी हे घडवून आणलंय ही शेवटाची सुरुवात आहे एवढच सांगतो असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले.