मुंबई : भ्रष्टाचाराविरोधात अनेक नेत्यांच्याविरोधात लढले, पण एकनाथ खडसेंच्या विरोधात लढताना खूप त्रास झाला. आपला मोबाईल नंबर ट्रेनमध्ये लिहिला आणि त्यावरून रोज असंख्य फोन यायचे. त्यानंतर बीपीचा त्रास सुरू झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले. आता माझे काही झाले तरी चालेल, माझ्या जीवाचे काहीही होवो पण मी लढायचे सोडणार नाही असेही अंजली दमानिया यांनी सांगितले.
अंजली दमानिया म्हणाल्या की, मी आतापर्यंत छगन भुजबळ, अजित पवार, नितीन गडकरी, नवाब मलिक अशा अनेकांच्या विरोधात लढले. त्यावेळी एवढा त्रास झाला नव्हता. पण एकनाथ खडसेंच्या विरोधात लढताना खूप त्रास झाला. खडसेंनी अतिशय वाईट पद्धतीने त्रास दिला. माझे नाव आणि नंबर ट्रेनमध्ये लावण्यात आले. खट्टी मिठी बाते करणे के लिए ये नंबर पे कॉल करो असे लिहून माझा नंबर देण्यात आला. भुसावळवरून जाणा-या ट्रेनमध्येच हे लिहिलेले असायचे. त्यावरून रोज असंख्य कॉल यायचे. प्रत्येकाशी बोलताना खूप राग यायचा.
जीवे मारण्याची धमकी
खडसे प्रकरणात लढा सुरू असताना एका रात्री एक फोन आला आणि आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. खडसेंच्या विरोधात लढणे बंद कर नाहीतर तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही अशी धमकी आली. त्याच्यानंतर आपल्याला बीपीचा त्रास सुरू झाला असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. आता माझं काही झालं तरी चालेल, माझ्या जीवाचं काहीही होवो पण मी लढायचं सोडणार नाही. मला तीनवेळा सुरक्षा देण्याचा प्रस्ताव आला, पण मी तो नाकारला. कारण एखाद्याला मारायचं असेल तर तो मारणारच असे अंजली दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानियांचा बोलवता धनी कोण?
अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कुणीतरी आहे असा आरोप सातत्याने केला जातो. त्यावर बोलताना दमानिया म्हणाल्या की खडसेंविरोधात आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पुरावे दिल्याचा आरोप केला गेला. तर अजित पवारांच्या विरोधात आरोप केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याला पुरावे दिल्याचा आरोप केला. पण देवेंद्र फडणवीस असो वा पृथ्वीराज चव्हाण, त्यांना पेपर्स आणि पुरावे हे आपण दिले आहेत. एखादा व्यक्ती कोणताही स्वार्थ न ठेवता असं काम करू शकतो यावर राजकीय नेत्यांचा विश्वासच नाही. त्यामुळे आपला बोलवता धनी कुणीही नाही.