25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeसोलापूरसोलापुरात जातीय दंगल घडविण्याचा डाव होता

सोलापुरात जातीय दंगल घडविण्याचा डाव होता

सोलापूर : सोलापुरात लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असताना मतदानाच्या दोन दिवसांअगोदर भाजपच्या टीमकडून जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेला होता, असा थेट आरोप काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून संपूर्ण मतदारसंघात तालुका पातळीवर कृतज्ञता मेळावे आखले जात आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्राचा कृतज्ञता मेळावा शनिवारी दुपारी जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रथमच गौप्यस्फोट करीत, सोलापुरात भाजपवाल्यांकडून जातीय दंगल घडविण्याचा डाव होता, असा थेट आरोप केला.

यावेळी त्यांनी गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख करीत त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, सोलापूरची लोकसभा निवडणूक आपल्या हातून निसटली आहे, हे फडणवीस आणि त्यांच्या अनुयायांना माहीत होते. म्हणूनच मतदानाच्या दोन दिवस अगोदर जातीय दंगल घडविण्याचा त्यांचा डाव होता. भाजपच्या संबंधित नेत्यांनी मतदानाच्या पाच दिवस अगोदरची निवडणूक प्रचारात केलेली भाषणे काढून पाहा. त्यांच्या हालचालीही तशाच होत्या. यातून त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्यांना खरे तर लाज वाटायला हवी, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली.

निवडणूक काळात दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय दांगली घडविण्याचा डाव आखला जात असताना सुदैवाने शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे सतर्क राहिले. त्यांनी कणखर भूमिका घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यामुळे प्रसंग टळल्याचा दावाही त्यांनी केला. या मेळाव्यात माजी आमदार दिलीप माने, पक्षाचे दक्षिण सोलापुरातील नेते सुरेश हसापुरे आदींनी भाषणे केली. आगामी विधानसभा निवडणुकीतही एकजूट दाखवून भाजपला हद्दपार करण्याचे आवाहन दिलीप माने यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR