22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रशनिशिंगणापूर संस्थानचे विशेष ऑडिट होणार

शनिशिंगणापूर संस्थानचे विशेष ऑडिट होणार

शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

अहमदनगर : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर संस्थानचे विशेष ऑडिट करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षवेधीनंतर सरकारने मोठी घोषणा केली आहे. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत होते.

शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये ६५ कर्मचा-यांची आवश्यकता असताना १८०० कर्मचारी हे देवस्थानमध्ये काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ६५ कर्मचा-यांपैकी देखील केवळ १२ कर्मचारीच हे कामावर येत असून बाकीच्यांना घरबसल्या पगार मिळत असल्याचा मुद्दा बावनकुळे यांनी मांडला. सोबतच शनिशिंगणापूर येथील चौथ-­यावर जाण्यासाठीची पाचशे रुपयांची पावती ही संस्थानामध्ये न बनवता ती बाहेरच बनवली गेली असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आणि या पावतीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित देणगी ही शनैश्वर नावाच्या खासगी शाळेच्या नावावरती वसूल केली असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.

उच्चस्तरीय चौकशी करण्याची बावनकुळेंची मागणी
शनिशिंगणापूर येथे २४ तास वीज असताना देखील ४० लाख रुपयांचे डिझेल प्रत्येक महिन्याला जनरेटरसाठी वापरले असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थानला मागच्या दहा वर्षांमध्ये जेवढे काही दान आले आहे आणि त्याचा खर्च कुठे झाला याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR