नवी दिल्ली/ पुणे : यंदा देशामध्ये उष्णतेची लाट येणार असून त्यापासून मध्य भारताला अधिक धोका आहे. त्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिसा आदी भागांचा समावेश आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव कसा करावा, यासाठी मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पावसाचा अंदाज मे महिन्याच्या अखेरीस देण्यात येईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी पृथ्वी मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी कमल किशोर आदी उपस्थित होते. याप्रसंगी हवामान खात्याने उष्णतेची माहिती देण्यासाठी काय-काय उपाययोजना केल्या आणि कशाप्रकारे त्या राबविल्या जातील, त्याची माहिती दिली. महापात्रा म्हणाले, यंदा तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य भारतामध्ये याचा अधिक परिणाम जाणवणार आहे. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, हिमालचल प्रदेश, बंगाल, महाराष्ट्राचा समावेश आहे. तसेच समुद्रकिनारी असलेल्या भागातही त्याचा फटका बसेल. एप्रिल महिन्यात देशातील सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. जवळपास ३९.२ मिमी पावसाची नोंद होईल. देशात १ ते ७ एप्रिल दरम्यानचे तापमान सरासरी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढेल.
मार्च महिन्यामध्ये सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. एक-दोन अंश सेल्सिअस वरखाली झाले. आता एप्रिल महिन्यात यामध्ये दोन ते तीन अंशाने वाढ होईल. त्यामुळे एप्रिल महिन्यातील कमाल तापमान हे ४२ अंशापर्यंत जाईल आणि मे महिन्यात साधारणपणे ४४ अंशापर्यंत त्याची नोंद होऊ शकते, असेही महापात्रा यांनी सांगितले.
कमाल तापमान कसे असेल ?
मार्च महिना : ३६ ते ४०
एप्रिल महिना : ३८ ते ४२
मे महिना : ४२ ते ४४