मुंबई : प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आरोपांच्या भोव-यात अडकलेले धनंजय मुंडे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्यामुळे दोन वर्षांची शिक्षा झालेले माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र मे दो ही गुंडे, कोकाटे-मुंडे, कोकाटे-मुंडे…. अशा घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला होता.
दरम्यान राजीनाम्यासाठी वाढणारा दबाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे आणि कोकाटे यांच्यासोबत स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चेचा तपशील बाहेर आलेला नसला तरी दोघांच्याही मंत्रीपदावरील सावट गडद होत चालले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांना पाठबळ दिल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आहे. याशिवाय मागील सरकारमध्ये कृषी मंत्री असताना काही कथित गैरव्यवहार झाल्याचे आरोपही त्यांच्यावर असून सत्ताधारी भाजपाचे आमदार सुरेश धस, प्रकाश सोळुंके यांच्यासह विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटल्याबद्दल दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
या दोघांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आज विधानभवनात घोषणाबाजी केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाबद्दलच्या शोकप्रस्तावामुळे आज विधानसभेचे कामकाज लवकर तहकूब झाले. त्यामुळे हा विषय उद्या सभागृहात लावून धरण्याची विरोधकांची रणनीती आहे.
विधानपरिषदेत विरोधक आक्रमक
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्र्यांवरील आरोपांचा विषय उपस्थित केला. राज्याच्या एका कृषी मंत्र्यांला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. वरिष्ठ न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे सभागृहाच्या नेत्यांनी त्यासंदर्भात खुलासा करावा, अशी मागणी दानवे यांनी केली. त्यावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ झाला. गोंधळ सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आले आणि त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आज देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शोकप्रस्तावादरम्यान असा गोंधळ होणे योग्य नाही. मात्र ज्या मंत्र्यांच्या संदर्भात विषय मांडला गेला आहे, त्याबाबत न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली आहे. त्याची ऑर्डर आल्यानंतर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर गोंधळावर पडदा पडला.
बैठकांचे सत्र
या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित होते. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर राजीनामा घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे समजते. तर धनंजय मुंडे यांच्याही मंत्रीपदावर गंडांतर येऊ शकते अशी चर्चा आहे.