परभणी : जिल्ह्यात ऍल्युमिनीयम तार चोरीच्या घटनांचा शोध करत असताना पोलिसांनी २ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी ८ चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. त्यांच्याकउून ३ लाख ५० हजार रूपये नगदी, २ चारचाकी वाहने व ३ मोबाईल असा एकुण १३ लाख ८० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्ह्यात अल्युमिनीयम व कॉपर तार चोरीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लक्ष्मण भागोजी पवार रा. गव्हा व जय भगवान काळे रा. नृसिंह साखर कारखाना जवळ सिंगणापूर यांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असताना त्यांनी मागील १ वर्र्षापासून लाईट पोलवरील ऍल्युमिनीयम तारेची चोरी करत असल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेली तार सय्यद कलीमोद्दीन सय्यद जैनुलाबद्दीन रा. काद्रबाद प्लॉट परभणी यांना विक्री केल्याचे सांगितले. चारचाकी वाहनाने जिल्ह्यातील गंगाखेड, सेलू, दैठणा, ताडकळस, परभणी ग्रामीण असे ८ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
आरोपींकडून विक्री केलेल्या मुद्देमालाच्या रकमेपैकी ३ लाख ५० हजार रूपये नगदी, २ चारचाकी वाहने, ३ मोबाईल असा एकुण १३ लाख ८० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना सेलू पोलिसांत हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे नेतृत्वात स्थागुशा पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकातील सपोनि. भारती, पोउपनी. गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदन परीहार, सपोउपनि. मधुकर चटे, जक्केवाड, पोह. तुपसुंदरे, विलास सातपुते, गायकवाड, फारूखी, जाधव, दुधाटे, भदर्गे, फड, चव्हाण, पोशी. ढवळे, ढगे, परसोडे, चालक घुगे, हुसेन, महिला पोह अव्हाड यांनी केली.