बीड : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असताना, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे.
वाल्मिक कराडच्या बातम्या बघितल्या या क्षुल्लक कारणातून ही मारहाण झाली. मारहाणीच्या या घटनेनंतर आणखी एक घटना समोर आली आहे. ज्यात चार ते पाच जणांनी एका तरुणावर हॉटेलमध्ये घुसून हल्ला केला आहे. आरोपी हॉटेलमध्ये घुसल्यानंतर दोन सेकंद थांबले, त्यानंतर बेसावध असलेल्या तरुणावर फायटरने हल्ला केला आहे. या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हीडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
बीड शहराच्या मोमिनपुरा भागात दिवसाढवळ्या गुंडागर्दीचा प्रकार समोर आला आहे. मोहम्मद खलील राशिद असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नजीब खान उस्मान खान, खिजर खान शरीफ खान यांच्यासह काही जणांनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तीन टाके पडले आहेत. या घटनेचा व्हीडीओ आता समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी हे एकाच गल्लीत राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोरील रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती. या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील राशिद यांनी केली होती. या गोष्टीचा राग मनात धरूनच आरोपींनी हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही संपूर्ण घटना १९ जानेवारी २०२५ रोजी ‘हॉटेल शालीमार’मध्ये घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पण बीड शहरात खुलेआम गुंडागर्दीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार का? कायद्याचा धाक आहे का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.