सोलापूर : मी आणि महेश लांडगे सोलापुरात आलो म्हणजे हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चरही (देवाचा बुलडोझरही) लवकरच दिसेल. आम्ही ट्रेलर दाखण्यासाठी आलो होतो. बुलडोझर कुठे चालवला पाहिजे, याची माहिती घेतली असून बुलडोझर कुठे कुठे चालेल, हे त्या लोकांना कळेल, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला.
अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सोलापुरातील शास्त्रीनगर येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आमदार नीतेश राणे आणि महेश लांडगे सोलापुरात आले होते. या दोघांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी राणेंनी हा इशारा दिला आहे.
हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, तसेच त्यांच्या पाठीशी हे सरकार आहे, हे सांगण्यासाठी आम्ही आज सोलापुरात आलो होतो. पोलिस खात्यात काही सडके आंबे आहेत, त्यांची आम्ही पूर्ण माहिती घेतली आहे. कुठचा पीआय आमच्या कार्यकर्त्यांशी कसा वागला आहे. कोणी कार्यकर्त्यांवर हात उचलला आहे. त्याची सर्व माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, हे आपल्याला निश्चितपणे दिसेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
राणे म्हणाले, मीरा रोडवर ज्या प्रमाणे बुलडोझर कारवाई झाली, तशीच मागणी सोलापुरातील जखमींनी केली होती. त्यावर राणे म्हणाले की, मी आणि महेश लांगडे सोलापुरात आलो म्हणजे हा ट्रेलर आहे. पिक्चरही (देवाचा बुलडोझर) लवकरच दिसेल. आम्ही ट्रेलर दाखण्यासाठी आलो होतो. बुलडोझर कुठे चालवला पाहिजे, याची माहिती आम्ही घेतली आहे.
आमच्या राज्यात राहून अशा पद्धतीची हिम्मत कोण करू शकत नाही. हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही. पोलिस खात्यातील काही अधिकारी हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांविरोधात काम करत असतील. तर आगामी काही दिवसांत काय काय होतंय, हे तुम्हाला सर्वांना दिसेल, असा इशाराही राणेंनी दिला. आम्ही दोघं सोलापुरात नेमकं काय घडलं, ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठीच आलो होतो. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावरील फक्त गुन्हे मागे घेण्याचा विषय नसून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयाचं संरक्षण आमच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. तो कोण पीआय होता, हे मला झोपेतून उठवलं तर मी सांगू शकतो. ज्यांनी मस्ती केली आहे ना, त्यांना लवकरच कळेल. कायद्यानुसार आमच्यावर गुन्हे दाखल झाले असतील. आम्हीही कायद्याने उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदुत्ववाद्यांचा द्वेष करणाऱ्यांना आम्ही त्यांच्या भाषेतच उत्तर देण्यासाठी आलो आहोत. आमच्या धर्माची जो इज्जत करेल, आम्हीही त्याचीच इज्जत करू. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे आम्ही डोळे काढू, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यापुढे चिंता करू नये. अन्याय करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी आम्ही ठेवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.