22.6 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeमहाराष्ट्रयंदा राज्यात १४५ लाख हेक्टरवर पीक लागवड

यंदा राज्यात १४५ लाख हेक्टरवर पीक लागवड

पुणे : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने सुमारे १४५ लाख हेक्टरवर पीक लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी १९ लाख टन बियाण्यांची गरज असली तरी प्रत्यक्षात २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तर एकूण ४६.८२ लाख मेट्रिक टन खतांचा कोटा मंजूर झाला असून, सद्य:स्थितीत राज्यात २५.५७ लाख टन खत साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतक-यांनी चिंता करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यंदा सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत २ लाख हेक्टरने घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. राज्यात गेल्या खरीप हंगामामध्ये १४२.३८ लाख लाख हेक्टर पेरणी क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टाच्या तुलनेत १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातून एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत १२१ टक्के उत्पादन झाले होते. कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात राज्यात १४४.९७ लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य व कापूस या पिकांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी १९.१४ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत २५.०८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

यातून अन्नधान्य, गळीत धान्य पिकांचे २०४.२१ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उत्पादन साध्य करण्याच्या दृष्टीने राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांचे पुरेसे साठे असून बियाण्याच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी बियाणे नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे अशी माहिती गुणवत्ता नियंत्रण संचालक सुनील बोरकर यांनी दिली.

गेल्या खरिपात पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना फटका बसला. त्यातच हमीभावाने खरेदी योजना उशिराने सुरू झाल्याने शेतक-यांना त्याचा फायदा झाला नसल्याचा आरोप झाला. आर्थिक फटका बसल्याने यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागानेही तसे नियोजन केले आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र ४२ लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी त्यात विक्रमी १० लाख हेक्टरची वाढ होऊन प्रत्यक्ष लागवड ५२ लाख हेक्टर झाली होती. यंदा कृषी विभागाने ५० लाख हेक्टरवर लागवडीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यासाठी १३ लाख २५ हजार ६२५ लाख क्विंटल बियांण्याची गरज असून प्रत्यक्षात १७ लाख १५ हजार ६३४ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

कापसासाठी ४१ लाख हेक्टरचे उद्दीष्ट
कापूस पिकाच्या लागवडीसाठी गेल्या वर्षाइतकेच अर्थात ४१ लाख हेक्टरचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी ८२ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असताना प्रत्यक्षात १ लाख २२ हजार ६७७ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करण्यात आल्याचेही बोरकर यांनी सांगितले. तर भात पिकाखाली १५ लाख २५ हजार हेक्टर लागवड होण्याचा अंदाज असून त्यासाठी २ लाख १९ हजार ६०० क्विंटल बियाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात २ लाख ९२ हजार ९८६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

राज्यात मुबलक बियाणे : बोरकर
राज्यात बियाण्यांची उपलब्धता गरजेपेक्षा जास्त आहे. तर गेल्या वर्षी ४४.३० लाख टन खतांचा वापर झाला होता. यंदा खरिपात ४६ लाख ८२ हजार टन खतांची आवश्यकता असून सध्या २६ लाख ५९ हजार टन खतांची उपलब्धता असल्याची माहिती कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण संचालक सुनील बोरकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR