22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरयंदा पहिल्यांदाच परीक्षेनंतर २० ते २५ दिवसांत विद्यापिठाचे निकाल जाहीर

यंदा पहिल्यांदाच परीक्षेनंतर २० ते २५ दिवसांत विद्यापिठाचे निकाल जाहीर

सोलापूर : निकालातील त्रुटींमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नेहमीच चर्चेत राहिले. पण, आता कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी या विभागावरच फोकस केला आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच परीक्षेनंतर २० ते २५ दिवसांत निकाल जाहीर केले जात आहेत. हाच नवा पॅटर्न आता पुढील काळातही राबविला जाणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची शेवटचे सत्र विविध अडचणींमुळे लांबणीवर पडले होते. १२ जूनपासून विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे सत्र सुरू झाल्यानंतरही निकाल विलंबाने लागतील, असे सर्वांनाच वाटत होते. पण, विद्यापीठाने निकालाचा नवा पॅटर्न सर्वांसमोर आणला आहे. पदवीच्या पारंपारिक अभ्यासक्रमाचे पेपर ऑफलाइन पद्धतीने तपासले जात आहेत. तर पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी ऑनस्क्रिन पद्धत आहे.

याशिवाय पदव्युत्तर पदवीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी देखील ऑनस्क्रिन पद्धतीनेच तपासले जात आहेत. दोन हजार २०० प्राध्यापकांवर तब्बल साडेतीन लाख उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून वेळेवर उत्तरपत्रिका तपासणी होत असल्याने निकाल मुदतीपूर्वी जाहीर होत आहेत. दरम्यान, आता विद्यार्थ्यांचे गुण थेट स्वॉफ्टवेअरमध्येच नोंदवले जात असल्याने निकालात त्रुटी राहणार नाहीत, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी निकाल वेळेत जाहीर होणे जरुरी आहेत. अगोदरच परीक्षेला विलंब झालेला होता.

त्यामुळे विद्यापीठाचा वारंवार सर्व प्राचार्यांकडे पाठपुरावा सुरू होता. दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला. वेळप्रसंगी प्राचार्यांना पत्र पाठवून उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण करण्याच्या सूचनाही विद्यापीठाने केल्या. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर होत असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. कुलगुरू, प्र कुलगुरू, सर्व अभ्यासक्रमांचे अधिष्ठाता यांचा पाठपुरावा, प्राचार्यांसह उत्तरपत्रिका तपासणी करणाऱ्या सर्वांचे सहकार्य मिळाल्याने परीक्षा झाल्यापासून २० ते २५ दिवसांत जवळपास ४० अभ्यासक्रमांचे निकाल लागले आहेत. आता २२ जूनपर्यंत उर्वरित सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होतील, असा विश्वास आहे.असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR