पुणे : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी हिंमतीने संपूर्ण प्रसंगाचा सामना केला. म्हणूनच त्यांना येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दुपारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश होता. यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी, पुण्यातील कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे आणि पनवेल येथील दिलीप डिसले या पर्यटकांचा निष्पाप बळी गेला. आता या कुटुंबीयांना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली आहे.
जम्मू काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करुन दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. अतिरेक्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने (सर्व राहणार डोंबिवली), दिलीप डिसले (पनवेल), कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे पुण्याचे रहिवाशी मरण पावले. या घटनेमुळे देशातील जनमानस शोकसंतप्त आहे.
ही घटना भारतीयत्वावर हल्ला असून या दहशतवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी नागरिक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबीयांना या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नागरी शौर्य पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या घटनेत या कुटुंबांनी जे गमावले याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही पण तरीही या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे. स्व संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी या उच्चशिक्षित असून त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे.