लातूर : प्रतिनिधी
आजच्या घडीला आजूबाजूला इतक्या लाजिरवाण्या करणा-या घटना जगभर घडत आहेत की सगळ्या संवेदनाच थिजून गेल्यासारखे वाटते आहे. घर, राज्य सोडून कामासाठी आलेल्या कामगारांचे लोंढेच्या लोंढे अस्तित्वाचे ओझे पेलत पायी निघाले होते, तेव्हा त्यांना थांबवू शकलो नाही; चोवीस तास खोटे आणि द्वेषभरले गरळ ओकणा-या कोणाचेच तोंड गप्प करू शकत नाही; अनाथ बालिकांचे शोषण थांबवू शकत नाही; धर्माच्या नावाखाली देश दुभागायला निघालेल्यांच्या तोंडावरचा मुखवटा काढू शकत नाही. आपण करू तरी काय शकलो आजवर? असा सवाल लेखक व ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केला.
‘ऐवज – एक स्मृतिबंध’ हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले. या निमित्ताने लातूर कलामंच व विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ मार्च २०२५ रोजी अमोल पालेकर व संध्या गोखले यांची प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी वरील खंत व्यक्त करीत हा सवाल केला. ज्येष्ठ पत्रकार श्याम जैन व भारती गोवंडे यांनी ही मुलाखत घेतली.
माझ्या कारकिर्दीमध्ये मी त्याच त्याच भूमिका केल्या नाहीत. माझे प्रारंभीचे ‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’ व ‘चितचोर’ हे तीन चित्रपट सिल्वर ज्युबिली झाले. पण मी त्यानंतर ‘भूमिका’ चित्रपटात खलनायक केला, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, माझ्यातील अभिनेता, कलावंताला नेहमीच काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे करायची आस होती. यात एक जोखीम होती, पण मी ती स्वीकारली.
अमोल पालेकर यांनी त्यांच्या साठ वर्षातील समांतर चित्रपट, प्रायोगिक नाटके व मुख्य धारेतील चित्रपटांचा पट रसिकांसमोर काही आठवणी सांगत व प्रसंगी स्षटीकरण देत उलगडला. ते म्हणाले की, मी कधीही व्यावसायिक नाटक केले नाही. त्याचप्रमाणे चित्रपट करताना नेहमी मला आवडतील त्याच विविधांगी भूमिका स्वीकारल्या व साकारल्या. मला न आवडणारी भूमिका मी स्पष्टपणे नाकारीत असे.
मुलाखतीच्या प्रारंभी अमोल पालेकर यांचा सत्कार कलामंचचे डॉ. बी. आर. पाटील, डॉ. गणेश गोमारे व विलासराव देशमुख फाउंडेशनच्या संगीता मोळवणे यांनी केला तर संध्या गोखले यांचा सत्कार संगीता मोळवणे यांनी केला. यावेळी व्यासपीठावर कलामंचचे प्रा. ज्ञानेश्वर चौधरी, सुपर्ण जगताप, डॉ. गणेश पन्हाळे आदी उपस्थित होते. प्रा. ज्ञानेश्वर चौधरी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डी. उमाकांत, राहुल लोंढे, प्रा. क्रांती मोरे, दशरथ भिसे, उत्तरेश्वर बिराजदार, शाम येनगे, अनिल कांबळे, आदींनी प्रयत्न केले.