हैदराबाद : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके आणि पाकिस्तानातील काही दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. भारताने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या हल्ल्याचे काही व्हीडीओही भारतीय सेनने सार्वजनिक केले आहेत असे असतानाच आता भारताच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तथा अध्यात्मिक गुरु श्री श्रकी रविशंकर यांनीदेखील भारताच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. संवाद, चर्चा केल्याने ज्यांना काहीही समजत नाही, त्यांना अशा प्रकारचे उत्तर देणे गरजेचे असते असे रविशंकर यांनी म्हटले आहे. परदेशात राहणारे मूळच्या भारतीय लोकांत सध्या घबराट आहे, भीती आहे. आता काय होईल? असे त्यांना वाटत आहे. आम्ही त्यांना वारंवार सांगत आहोत की सर्वकाही चांगले होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश योग्य निर्णय घेत आहे. त्यामुळे कोणालाही दहशतीत राहण्याची किंवा चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय की आपल्यासोबत देव आहे. सर्वकाही ठीक होईल अशी प्रार्थना करा. धीर धरा. सर्वकाही ठिक होत आहे अशी प्रतिक्रिया श्री श्री रविशंकर यांनी दिली.
फक्त दहशतवादी तळांवर हल्ले
दहशतवाद हा मानवताविरोधी आहे. दहशतवादाला समूळ नष्ट करायला हवे. आपल्या देवी-देवातांकडे पाहा. आपल्या देवतांच्या एका हाता फूल आहे तर दुस-या हातात शस्त्र आहे. चर्चेतून, संवादातून ज्यांच्यामध्ये बदल होत नाही, त्यांना धडा शिकवावा लागतो. या बाबतीत भारताने मोठ्या विनयासह, समजदारीने पाऊल उचलले आहे. भारताने फक्त दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले आहेत. भारताची ही भूमिका प्रशंसनीय आहे अशी प्रतिक्रिया श्री श्री रविशंकर यांनी दिली.