मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकीबद्दलची माहिती मिळताच मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. रेल्वे स्थानकावर पथकांना पाचारण करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पोलिस नियंत्रण कक्षातील ११२ नंबर कॉल करण्यात आला. कॉल केलेल्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, सीएसएमटी रेल्वे स्थानका बॉम्ब ठेवण्यात आला आहे. व्यक्तीने ज्या नंबरवरून कॉल केला तो त्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रवाशांची गर्दी असलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीने पोलीस दलात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथक आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण स्थानकाची आणि संशयित ठिकाणांची तपासणी केली. रात्री ९.३० वाजता शोध मोहीम थांबवण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, पोलिसांनी आता कॉल करून धमकी देणा-या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
















