बंगळुरू : कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोध मोहीम सुरू केली आहे. कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यंत्रणा सतर्क करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली.
फोन कोणी केला याबाबत काही कळू शकलेले नाही. फोन कॉल आल्यानंतर बॉम्ब स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्यानंतर राजभवन परिसरात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
सुरक्षा यंत्रणांनी राजभवन परिसराची तपासणी केली आहे. आतापर्यंत त्यांना काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. तरी खबरदारी म्हणून सर्वत्र कसून शोध सुरू आहे. फोन कॉलच्या उगमाबाबतही तपास सुरू आहे. फोन कॉल ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही याबाबत अलर्ट कॉल आला होता. यात राजभवनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश देण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने बंगळुरू पोलिसांना सतर्क केले. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.