अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टसह उत्तर प्रदेशातील १०-१५ जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिका-यांनाही अधिकृत ईमेलवर धमकीचा मेल आला. याप्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हा ईमेल तामिळनाडूतून आल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी सायबर सेल अधिक तपास करीत आहेत.
सोमवारी रात्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या मेलवर धमकीचा मेल आला होता. यासह राज्यातील १० ते १५ जिल्हा दंडाधिका-यांनाही अयोध्यातील राम मंदीर बॉम्बने उडवून देण्याचा मेल आला. या मेलमध्ये मंदिराची सुरक्षा वाढवण्याचे लिहिले आहे. हा मेल तामिळनाडून आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबरने पुढील तपासाला सुरुवात केली. अयोध्यासह बाराबंकी आणि इतर शेजारील जिल्ह्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले.
राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आधीच तैनात असलेल्या सीआरपीएफ आणि यूपीएसएसएफच्या तुकड्या आणखी मजबूत करण्यात आल्या. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून मंदिर परिसरावर नजर ठेवली जात आहे. मंदिरात येणा-यांची कसून तपासणी केली जात आहे. गुप्तचर यंत्रणाही संभाव्य धोक्याची चौकशी करत आहेत.
अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १३५.५ दशलक्ष देशांतर्गत भाविक भेट देतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत ताजमहालपेक्षा अधिक लोकांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली होती. पर्यटक आणि भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक पोलिसांनी शहराभोवती गस्त वाढवली आहे. अयोध्येतील राम मंदिराभोवती सुमारे चार किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत उभारली जात आहे, ज्याचे काम १८ महिन्यात पूर्ण होईल, असे राम जन्मभूमी मंदिर इमारत बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले.