बुलढाणा : मी शेतकरी आहे. माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही, माझ्या आजोबांनी पण नाही , माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी देखील वीज बिल भरलेले नाही. किंबहुना विजेची डी.पी. जळाली तर संबंधित इंजिनियरला एक हजार रुपये दिले की झाले काम! असा अजब किस्सा शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी सांगीतला. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे दोन केंद्रीय मंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रताप जाधव आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री प्रताप जाधव यांनी हा वक्तव्य केले आहे.
जसे दोन सम विचारी बैल शेतीत जुंपले की शेती चांगली होते, तस सरकारच आहे. केंद्र आणि राज्य सरकार समविचारी असले की विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक खासदारांवर, प्रत्येक खात्यांवर बारीक लक्ष असते. असेही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. असे असताना मात्र, मी मंत्री झाल्यावर आमचा सामान्य माणसाशी संपर्क कमी होतो आहे, याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
पंतप्रधान मोदींचा ४०० पारचा नारा अंगलट
गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी दिलेला ४०० पारचा नारा हा आमच्याच अंगलट आला असल्याची कबुलीही मंत्री प्रताप जाधव यांनी यावेळी दिली. ४०० पारच्या ना-यामुळे आमचे कार्यकर्ते गाफील राहिले. असे असले तरी परत एकदा शिस्तीने चालणारा पंतप्रधान आपल्या नशिबाने आपल्या देशाला मिळाला आहे. अनेक जटिल प्रश्न त्यांनी सहज सोडवलेले आहेत. २०२९ नंतर आमच्या सोबत ३३ टक्के महिला लोकसभेत असतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.