पालघर : वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात तीन रेल्वे कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना काल रात्री घडली आहे. रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम हे तीन कर्मचारी करत होते. आणि त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
चिफ सिग्नल इन्स्पेक्टर वासू मित्रा (वय ५६), टेक्निशियन सोमनाथ उत्तम (वय ३६), असिस्टन्ट सचिन वानखेडे (वय ३५) अशी मयत रेल्वे कर्मचा-यांची नावे आहेत. वसई रेल्वेस्थानकाच्या अर्धा कि.मी. दूर (५०/१) हा अपघात झाला आहे. नायगाव- वसई रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक चेंज करण्याची पॉईंट मशिन फेल झाली असल्याने त्याच्या तपासणीचे काम करत होते. त्याच दरम्यान विरारहून चर्चगेटला जाणारी रात्री ८.५९ ची लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक २ हून चर्चगेटच्या दिशेने जात असताना, हे तीन कर्मचारी रेल्वेखाली आले. यात या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रेल्वे अपघातात एकाचवेळी तीन कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याने वसई विभागातील सर्व रेल्वे कर्मचारी आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. सध्या तिघांच्याही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, यातील सोमनाथ उत्तम यांचा मृतदेह सोलापूरला त्यांच्या गावी नेण्यात आला. सचिन वानखेडे यांचा मृतदेह नागपूरला नेण्यात आला तर वासू मित्रा यांचा मृतदेह वसई येथे नेण्यात आला आहे. हा अपघात कसा झाला.. यात निष्काळजीपणा कुणाचा? याबाबत आता रेल्वे प्रशासन चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.