पुरुलिया : पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळ्यासाठी उत्तर प्रदेशहून आलेल्या तीन सांधूना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. ११ जानेवारी) सायंकाळी पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात सदर घटना घडली. हे साधू अपहरणकर्ते असल्याचे समजून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेवरून आता राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यामुळेच साधूंवर हल्ले होत आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे. पोलिसांनी मात्र ही घटना गैरसमजुतीतून झाली असल्याचे सांगितले.
उत्तर प्रदेशमधील तीन साधू भाड्याने घेतलेल्या गाडीतून मकरसंक्रांतीनिमित्त गंगासागर मेळ्याला जात होते. या गाडीत साधूंच्या व्यतिरिक्त एक व्यक्ती आणि त्याचे दोन मुलेही उपस्थित होती. पुरुलिया जिल्ह्याजवळ पत्ता विचारत असताना स्थानिक लोकांना त्यांच्यावर संशय आला. तसेच काही अल्पवयीन मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर, हे लोक लहान मुलांचे अपहरण करणारे असल्याचे समजून तिथे गर्दी जमायला लागली आणि त्यानंतर साधूंना मारहाण करण्यात आली.
पुरुलिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिजीत बॅनर्जी यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. तसेच ज्या लोकांनी मारहाण केली, त्यांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथक पाठविण्यात आलेले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, साधू मेळ्याला जात असताना रस्ता चुकले होते. त्यामुळे रस्त्यात थांबून तिथून जात असलेल्या दोन मुलींना रस्त्याबाबत विचारणा केली. मात्र साधूंच्या वेषाकडे पाहून मुली घाबरल्या आणि तिथून पळ काढू लागल्या. या साधूंनी त्यांची छेड काढली असावीकिंवा ते अपहरणकर्ते असावेत, अशी स्थानिकांची समजूत झाली.