जिंतूर : तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा, भुसकवडी, चितनरवाडी गावांना पक्का डांबरी रस्ता मिळावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून उलगुलान आंदोलन करण्यात येत आहे. गावक-यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. हिवाळी अधिवेशनात बेलखेडा ते पिंप्राळा १.४० लक्ष, भुसकवडी ते गडदगव्हाण जोडरस्ता ३.५० लक्ष, चितनरवाडी पुल १.४० लक्ष असा ३ गावांना पक्का डांबरी रस्ता निर्मितीसाठी ६.३० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या शिवाय जिल्हा नियोजन समितीच्या वतीने रस्ता सुधारणा कामी पिंप्राळा ६० लक्ष आणि चितनरवाडी ५० लक्ष रुपयांचा निधी देखील प्राप्त झाला आहे.
जिंतूर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जवळपास २३ गावांना पक्का डांबरी रस्ता आणि पुल ऊपलब्ध नसल्याने गावांतील शिक्षण, आरोग्य आणि शेती व्यवसायावर परिणाम झाला होता. २३ गावांपैकी पिंप्राळा आणि चितनरवाडी या गावांना स्वातंत्र्यापासून पक्का डांबरी रस्ता मिळाला नाही. भुसकवडी या गावाची अक्षरश: ससेहोलपट सुरू होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रस्ता आणि पुलांसाठी ग्राम विकास मंत्रालयाकडे कोट्यवधीचा निधी अडकून पडला होता. दोन वर्षांपुर्वी २३ गावांतील नागरिकांनी उलगुलान आंदोलन करून लालफितीचा मार्ग मोकळा केला होता.
उर्वरीत पिंप्राळा भुसकवडी आणि चितनरवाडी या गावांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू होते. रस्त्याअभावी गावातील शिक्षण शेती विषयक प्रश्न निर्माण होऊन गावातील आजारी रुग्णांना उपचारासाठी वेळेवर पोहचता नं आल्याने प्राण गमवावे लागले होते. अखेर नागपूर हिवाळी अधिवेशनात आ.मेघना बोर्डीकर यांनी मतदारसंघातील रस्ता आणि पुलाच्या यादित या तीनही गावांचा रस्ता प्रश्न मार्गी लावला आहे. नविन वर्षाच्या सुरुवातीला निधी प्राप्त झालेल्या रस्त्यांचे भूमिपूजन करून आगामी पावसाळ्यापूर्वी रस्ता निर्माण करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.
जिंतूर सेलू मतदार संघासाठी आशियाई विकास बँकेकडून तब्बल ३५५ कोटी रुपयांसह मतदारसंघांमध्ये ४४५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर विकास कामांमध्ये डांबर आणि सिमेंट रस्ते, पुल, उडाणपुल, पथदिवे, ड्रेनेज, रस्ता चौपदरीकरण, रस्ता सुधारणा आणि रुंदीकरण, मंडळ आणि तलाठी कार्यालय बांधकाम यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
पक्का डांबर रस्ता आणि पुलाच्या निर्मितीसाठी गावक-यांनी उभारलेल्या उलगुलान लढ्याला आज निम्मे यश मिळाले आहे. रस्ता निर्मितीनंतरच खरे यश मिळालेले असेल. तेंव्हाच ख-या अर्थाने गावांत स्वातंत्र्याची पहाट उगवेल. हे सर्व यश गावक-यांच्या एकदिलाने लढलेल्या लढ्याचे आहे असे मत पत्रकार रत्नदीप शेजावळे (उलगुलान आंदोलन समन्वयक) यांनी व्यक्त केले आहे. रस्ता निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल. जिंतूर सेलू मतदार संघासाठी ४४५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून नागपूर हिवाळी अधिवेशनात दुर्गम भागातील गावांसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. भुसकवडी पिंप्राळा आणि चितनरवाडी गावक-यांना दिलेला शब्द पाळला असून, रस्ता निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल अशी प्रतिक्रिया आ.मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.