धाराशिव : प्रतिनिधी
ऐन लग्नसमारंभाच्यावेळी नवरीकडील मंडळींनी नव-याकडील नातलगाच्या अंगावर मिरची पावडर टाकून दागिन्यासह रोकड असा २ लाख २० हजाराचा मुद्देमाल लूटन नेला. ही घटना परंडा तालुक्यातील ताकमोडवाडी येथे गुरुवारी (दि.७) भरदुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नवरीच्या आईसह दहा जणांवर आंबी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.१०) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत आंबी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी चॉकलेटीबाई नवनाथ भोसले, दिपाली नवनाथ भोसले व इतर ८ ते १० अनोळखी पुरुष व महिला (सर्व रा. ताकमोडवाडी, ता. परंडा) यांनी रविवारी (दि.७) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ताकमोडवाडी येथे आरोपीचे राहते घरासमोर फिर्यादी विजय प्रताप पाटील (वय ३९) रा. अंतुली ब्रु. ता. पाचोरा, जि. जळगाव यांचे पुतण्याचे लग्न आरोपी चॉकलेटीबाई यांच्या मुलीसोबत लावत असताना नमुद आरोपींनी रोख रक्कम एक लाख व तीन तोळे सोन्याचे दागिने असे एकुण दोन २० हजार रुपये किंमतीचा ऐवज घेवून यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांचे अंगावर मिरची पावडर टाकून फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईकांना फिर्यादीचे पुतण्याचे लग्नाचे अमिष दाखवुन विश्वासघात करुन फसवणुक करुन पळुन गेले. अशी फिर्याद विजय पाटील यांनी रविवारी (दि.१०) दिलेल्या फिर्यादीवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम ४२०, ४०६, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.