सोलापूर : वैराग-उक्कडगाव शिवारातील एका शेतक-याच्या गाईच्या तीन वासरू व एका रेडकावर वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली. तसेच दुसरीकडे ज्योतिबाची वाडी येथील शेतकरी नागेश कापसे यांच्या (काटी, ता. तुळजापूर) हद्दीतील शेतात बांधलेल्या गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे.
एकीकडे उत्तर बार्शी भागात वाघाने जनावरावर हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. तर दुसरीकडे वैराग भागात देखील बिबट्याने वासरावर हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैरागमध्ये बिबट्याने हल्ला करून रेडकाचा फडशा पडला होता. वाघापाठोपाठ बिबट्याने सलग दोन हल्ले केल्यामुळे वैराग भागात नागरिक व शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशीव रोड क्रॉस करून सर्जापूर हद्दीतील जंगलात बिबट्या जाताना नागरिकांनी पाहिले आहे. जवळगाव (ता. बार्शी) येथील बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्यानंतर शेतक-यांनी वनविभागाला याबाबतची कल्पना दिली असता कर्मचारी वेळेवर पोहोचले नाहीत. त्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे वन विभागाचे वाहन उपलब्ध नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. उक्कडगाव (ता. बार्शी) येथील नामदेव गोविंद थोरात यांच्या शेतात बांधलेल्या एका गायीच्या तीन वासरांवर व एका म्हशीच्या रेडकावर हल्ला करून ठार केले व वाघ पसार झाला आहे.
वन विभागाच्या अधिका-यांनी तेथे येऊन पंचनामा केला आहे. वाघ पिंज-यात न आल्याने ताडोबाच्या रेस्क्यू पथकाला निराशाच आली आहे. वाघाने येडशी परिसरातील एका शेतक-याच्या गायीवर हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर वन विभागाच्या ट्रॅप कॅमे-यामध्ये वाघ कैद झाला. मात्र वनविभागाच्या सापळ्यात अद्याप अडकला नसल्याने वनविभागाच्या कर्मचा-यांची चांगलीच दमछाक झाली आहे.