21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भातील वाघ ‘बफर झोन’च्या बाहेर

विदर्भातील वाघ ‘बफर झोन’च्या बाहेर

जंगलात शोधतायेत वास्तव्य

अमरावती : राज्यात पूर्वेकडे असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी नवा मार्ग शोधल्यामुळे विदर्भातील सर्व जिल्हे वाघांच्या अधिवासाचे प्रमुख केंद्र ठरू लागले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ हे अलीकडे विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशपर्यंत प्रवास करत आहेत. हे वाघ काही दिवस भ्रमंती करत असून कालांतराने मूळ अधिवासात परतत आहेत.

महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात असून विदर्भात ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट आणि नवेगाव- नागझिरा हे पाच व्याघ्र प्रकल्प आहेत. राज्यात वाघांची संख्या ३७० च्या वर असल्याची नोंद आहे. यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक २५० वाघ आहेत, तर मेळघाटात वाघांची आकडेवारी ७० ते ७५ आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचा संचार हाचिंतनीय ठरू लागला आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतून अनेक वाघ हे बाहेर पडत असल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे.

मध्यंतरी चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी ताडोबातील वाघ सह्याद्रीत हलविण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही मानव-वन्यजीव संघर्ष कायम आहे. विदर्भातील जंगलाचे प्रमाण लक्षात घेता पाच व्याघ्र प्रकल्प आणि २० च्यावर अभयारण्य आहेत. असे असले तरी ताडोबातून बाहेर पडणारे वाघ वणी मार्गे पांढरकवडा, यवतमाळ पुढे किनवट, माहूर होत वाशिम जिल्ह्यापर्यंत मजल गाठतात.

वाशिम जिल्हा झाला नवा कॉरिडॉर
वाघांचा वाशिम हा नवीन कॉरिडॉर वन विभागाने रेकॉर्डवर घेतला आहे. नवेगाव-नागझिरातून बाहेर पडणारे वाघ हे गडचिरोली, मध्य प्रदेशातील शिवणी, बालाघाट पुढे छत्तीसगडपर्यंत भ्रमंती करतात. याशिवाय बोर व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडणारे वाघ हे काटोल, कोंडाळी या मार्गाने अमरावती जिल्ह्यातील चिरोडी, पोहरा या वनक्षेत्रापर्यंत भ्रमंती करत आहेत.

सह्याद्रीत वाघ सोडण्याचा प्रस्ताव फाइल बंद
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढलेली संख्या आणि अपुरे अधिवास बघता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ताडोबातून काही वाघ सह्याद्रीत सोडण्याचा निर्णय घेतला होता. पुढे राज्य सरकारने हा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला. मात्र, हा प्रस्ताव फाइल बंद झाला आहे. सह्याद्रीत रत्नागिरी, सातारा, रायगड, कोल्हापूर हा भाग येत असून वाघांसाठी पोषक आहे. मात्र, गत पाच वर्षांत ‘डबल डिजिट’ आकडा गाठू शकले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR