नवी दिल्ली : गुरूवार दि. १५ ऑगस्ट रोजी देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आहे. देशभरात याची जय्यत तयारी सुरू असून राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून येणा-या-जाणा-या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. दिल्ली पोलिसांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याभोवती पाळत ठेवण्यासाठी ७०० एआय आधारित फेस डिटेक्शन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी सलग ११ व्यांदा राष्ट्रध्वज फडकवतील आणि देशाला संबोधित करतील. या सोहळ्यासाठी लाल किल्ल्याभोवती चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात दिल्ली पोलिस कोणतीही कसर सोडत नाहीत. लाल किल्ल्यावर सीसीटीव्ही कॅमे-यांशिवाय १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, पंतप्रधान आणि इतर मान्यवरांच्या सुरक्षेसाठी एलिट स्वॉट कमांडो, तसेच शार्पशूटरची तैनाती करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढविली
पोलिसांनी सांगितले की, एआय आधारित सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये हाय रिझोल्यूशन पॅन-टिल्ट-झूम फिचर्स आहेत, ज्याद्वारे दुरुन कोणालाही ओळखले जाऊ शकते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्टँड, मॉल्स आणि बाजारपेठेत निमलष्करी दलांसह अतिरिक्त सुरक्षा कर्मचा-यांची तुकडीही तैनात करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी राजधानीतील प्रमुख जंक्शनवर आणि लाल किल्ल्याकडे जाणा-या रस्त्यांवर सुमारे ३,००० वाहतूक पोलिस तैनात केले जातील. पोलिसांनी हॉटेल, गेस्ट हाऊस, पार्किंग लॉट आणि रेस्टॉरंट्सभोवती गस्त वाढवली असून भाडेकरू आणि नोकरांची पडताळणी केली जात आहे.