बीड : जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतक-यांच्या तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा न दिल्याने कोर्टाने बीडच्या जिल्हाधिका-यांची गाडी जप्त करून माजलगाव न्यायालयात जमा केली. गाडी जप्त केल्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी नामुष्की ओढवली असून या निर्णयाने खळबळ उडाली आहे.
वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे या शेतक-यांची जमीन लघु सिंचन तलावासाठी शासनाने संपादित केली होती. या जमिनीचा अत्यंत तुटूपुंजा मावेजा त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे या शेतक-यांनी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेत यासाठी दावा दाखल केला होता. या दाव्यावर कोर्टाने संबंधित शेतक-यांचे म्हणणे अंशत: मान्य करून २९ ऑक्टोबर २०१५ रोजी या शेतक-यांना वाढीव मावेजा द्यावा असा निकाल दिला होता. मात्र, शासनाने काही प्रमाणात रक्कम देऊन संपूर्ण रक्कम देण्यास चालढकल केली. त्यामुळे सह. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बुधवंत यांनी व्याज लावून सदर रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दहा दिवसांपूर्वी पारित केले होते.
पैशाची पुर्तता करू शकत नाही : जिल्हाधिकारी
कोर्टाने वादी यांचे वकील यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना मावेजा बाबत सोमवारी जाऊन आपली बाजू मांडली व रक्कम अदा करण्यास सांगितले. मात्र, जिल्हाधिकारी यांनी पैशाची पूर्तता करू शकत नाही. तुम्ही गाडी घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर कोर्टाच्या बेलीपने जिल्हाधिकारी यांची गाडी(क्रमांक एम एच २३ बीसी २४०१) कायदेशीर बाबीची पूर्तता करून जप्त केली. जप्त करण्यात आलेली गाडी माजलगाव कोर्टात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ आली आहे. याप्रकरणी वादी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे यांच्या वतीने अॅड. बाबुराव तिडके, एस.एस.मुंडे यांनी बाजू मांडली.