नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि टी २० वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून दोन वर्षे झाली आहेत. रॉबिन उथप्पाने २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच टीम इंडियासाठी २०१५ मध्ये शेवटचा सामना खेळला होता.
आयपीएलमध्ये काही वर्षे खेळल्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता रॉबिन उथप्पा क्रिकेट सामन्यात समालोचकाची भूमिका बजावत आहे. पण सध्या रॉबिन उथप्पा भारताऐवजी दुबईत राहात आहे. पॉडकास्टमध्ये उथप्पाने भारत सोडण्याचे कारण सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
रॉबिन उथप्पा गेल्या एका वर्षापासून दुबईत आपल्या कुटुंबासह कायमस्वरुपी वास्तव्यास गेला आहे. पण उथप्पाला पूर्णपणे भारताशी नाळ तोडता आली नाही. कारण उथप्पा देशात होणा-या विविध लीगमध्ये भाग घेतो. तसेच स्पोर्ट्स चॅनेल्सवर समालोचकाची भूमिकाही बजावतो. आता एका पॉडकास्टमध्ये उथप्पाने भारत सोडण्याचे कारण सांगितले आहे.
रॉबिन उथप्पाने सांगितले की, आपल्या मुलांना इथल्या ट्राफीकमध्ये त्रास होऊ नये म्हणून बंगळुरूहून दुबईला स्थायिक झाला आहे. मी माझं आवडते बंगळुरू शहर सोडले कारण माझ्या मुलांना अशा ठिकाणी ठेवणे योग्य नव्हते. कारण येथे अर्ध आयुष्य ट्राफीकमध्ये जाते.’ रॉबिन उथप्पाने पुढे नमूद केले की, नुकताच तो आणि त्याचे कुटुंब बंगळुरुमध्ये साडेचार तास ट्राफीकमध्ये अडकले होते.
रॉबिन उथप्पाने मुलीच्या आजारावेळी नेमके काय घडले तो प्रसंगही सांगितला. मुलीची तब्येत बिघडली होती तेव्हा तिला घरापासून ३.५ किमी अंतरावर नेण्यासाठी पुरती कसरत करावी लागली. या प्रवासासाठी ४५ मिनिटांचा अवधी लागला. तर तिथून घरी येण्यासाठी साडे चार तास लागले. हा प्रवास लक्षात घेऊनच मी माझ्या मुलीसाठी दूध आणि जेवण गाडीत ठेवले होते. ट्राफीच्या या समस्येला त्रासल्यानेच देश सोडण्याचा निर्णय घेतला.