25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रसामाजिक सलोख्याची पुनर्स्थापना करणार

सामाजिक सलोख्याची पुनर्स्थापना करणार

महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी बीड जिल्ह्यात काँग्रेस काढणार सदभावना पदयात्रा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बस्वेश्वर, चक्रधर स्वामी या महापुरुषांचा व जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महान संतांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे.

परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले दिसत आहे. महाराष्ट्राची उज्ज्वल संस्कृती व परंपरा लक्षात घेऊन सद्य परिस्थितीत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना पदयात्रेबद्दल सविस्तर माहिती दिली, ते पुढे म्हणाले की, इंग्रजांना देशातून बाहेर काढताना केवळ राजकीय स्वातंर्त्यच नाही तर व्यवस्था परिवर्तनाचाही महत्वाचा भाग होता. स्वातंर्त्याच्या आधीपासून असलेल्या काँग्रेस पक्षाच्या डीएनएमध्येच समाजवाद आहे. जाती भेदाच्या पलिकडे पाहण्याचा वारसा काँग्रेस पक्षाला वारसा लाभलेला आहे. सामाजिक सद्भावनेचा तोच वारसा आपल्या संविधानातही आलेला आहे.

एकीकडे संस्कृती, परंपरा व जाज्वल्य इतिहास आहे तर दुसरीकडे काही लोक आपल्या फायद्यासाठी जातीभेदाचे विष पसरवून सामाजिक भेद निर्माण करत आहेत हे अत्यंत दुर्देवी असून महाराष्ट्राच्या हिताचे नाही. यात बीड जिल्ह्याचा वारंवार उल्लेख होत आहे. या जिल्ह्यात स्त्री-पुरुष लोकसंख्येच्या गुणोत्तरात ही मोठी तफावत आहे. स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न या जिल्ह्यात ऐरणीवर होता. जागतिक महिला दिनाचे औचित्य लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथून ही पदयात्रा सुरु केली जाणार आहे.

भगवानगड व नारायणगड या महत्वाच्या प्रेरणास्थानी वंदन करून सामाजिक सद्भावनेसाठी साकडे घातले जाणार आहे. त्यानंतर ८ मार्च रोजी सकाळी मस्साजोग येथून ही पदयात्रा सुरु होईल. तिथून नांदुरफाटा, येळंब, नेकनूर, मांजरसुंभा, पाली या मार्गावरून ५१ किलोमीटरचा प्रवास करून यात्रा बीड शहरात पोहोचेल व बीड शहरात सद्भावना सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे असे सपकाळ म्हणाले.

दूषीत झालेले सामाजिक वातावरण बदलणार
सद्भावना यात्रा ही राज्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव पुर्नस्थापित करण्यासाठी आहे. हा फक्त राजकीय नाही तर एक सामाजिक उपक्रम आहे ज्याची सध्या महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे. सध्या दूषीत झालेले सामाजिक वातावरण बदलण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, तरुण, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनीही मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे अशी विनंती करून आगामी काळात परभणी व इतर ठिकाणीही अशीच सद्भावना यात्रा काढण्याचा विचार आहे असेही सपकाळ यांनी सांगितले.

अनावश्यक वक्तव्य करणे चुकीचे
दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील राजकीय विधानासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वेदना, व्यथा व कथा मांडल्या जातात, विचारांची देवाणघेवाण होते, वेदनांवर फुंकर घालण्याचे काम या व्यासपीठावरून व्हावे ही अपेक्षा असते. परंतु या व्यासपीठावरून अनावश्यक वक्तव्य करणे चुकीचे आहे, परंपरेला न शोभणारे आहे असे सपकाळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR