यंदाच्या लोकसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक इव्हेंटचे स्वरूप देत जगभरातील मोठ्या देशांतील २५ राजकीय पक्षांच्या नेत्यांना भारतात निवडणुका आणि सभा पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जगातील मोठ्या २५ राजकीय पक्षांच्या नेत्यांना देशात निवडणूक अभियान पाहण्यासाठी आणि भाजपचा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी निमंत्रित केले. यातील १५ राजकीय पक्षांनी आपली सहमती दर्शविली आहे आणि आपल्या नेत्यांना भारतात सार्वत्रिक निवडणुका आणि पंतप्रधान मोदी यांच्या सभा पाहण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटनमधील हुजूर आणि मजूर पक्ष, जर्मनीतील ख्रिश्चियन डेमोक्रॅटिक आणि सोशल डेमोक्रॅट पार्टी, फ्रान्सची द रिपब्लिकन्स आणि नॅशनल रेली, जपानची लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी, इस्रायलची लिकुड, ऑस्ट्रेलियाची ऑस्ट्रेलियन लेबर पार्टी, रशियाची युनायटेड रशिया पार्टी, बांगलादेशमधील अवामी लीग यांचा समावेश आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भाजपचा परराष्ट्र मंत्रालय विभाग
करणार पाहुण्यांची सरबराई
भाजपचा परराष्ट्रविषयक विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय विदेशातून येणा-या पाहुण्यांची व्यवस्था करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विशेष ठिकाणांवरील सभा आणि रोड शो पाहण्यासाठी हे नेते जातील. निवडणुकीच्या तिस-या आणि चौथ्या टप्प्यात म्हणजे पुढील महिन्यात मेमध्ये हे नेते देशात दाखल होतील. या नेत्यांसोबत भाजपच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या टीम राहतील.