38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्या‘केसीआर’च्या अस्तित्वाची लढाई!

‘केसीआर’च्या अस्तित्वाची लढाई!

काँग्रेस आणि भाजपमध्येच खरी लढत; तेलंगणवर कॉँग्रेसची सारी भिस्त

हैदराबाद : भारत राष्­ट्र समितीचा (बीआरएस) विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर तेलंगणमध्ये राजकीय चित्र पूर्णपणे पालटले. विधानसभेनंतर वर्षभरातच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये ‘बीआरएस’ला पुन्हा उभे राहण्यासाठी वेळ लागणार आहे. या निवडणुकीतील एकतर्फी विजयाने काँग्रेसचा दबदबा वाढला आहे.

तेलंगण आणि के.चंद्रशेखर राव ऊर्फ के. सी.आर. ही ओळख गेल्या १० वर्षांपासून होती. राष्ट्रीय पातळीवर राजकारणात प्रवेश करण्यासाठी के.सी.आर यांनी तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) केले. या नावानुसार त्यांनी तेलंगणच्या शेजारील राज्यांमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात नांदेडसह अन्य ठिकाणी जोरदार सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चितपट झाल्यानंतर के.सी.आर राव आणि त्यांच्या पक्षाला आता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन वेगळ्या तेलंगण राज्याची निर्मिती झाल्यानंतर के.सी.आर. राव यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले होते. सरकार आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी, काँग्रेस व तेलुगू देशम पक्ष फोडण्यासाठी त्यांनी जे धोरण राबविले होते, तेच त्यांच्यावर आता उलटले आहे. विधानसभेत के.सी.आर यांचे ३९ आमदार आहेत. पण ही संख्या कमी होऊ लागली आहे. कधी, कोणता आमदार काँग्रेसचा ‘हात’ धरेल याचा अंदाजही येत नाही, अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देऊनही नेते अन्य पक्षांत प्रवेश करीत आहेत. राज्याच्या राजकीय पटलावर ‘बीआरएस’ची अशी अवस्था पहिल्यांदा पाहायला मिळत आहे.

तेलंगणमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे. तीन पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर यशाची कमान कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेकडील राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यश देणारे राज्य म्हणून पक्षाचे लक्ष तेलंगणकडेच आहे. विधानसभेप्रमाणेच लोकसभेतही येथे जास्त जागा जिंकण्याची पक्षाला अपेक्षा आहे. २०१९ मधील निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळाला. आताच्या निवडणुकीसाठी अद्याप पक्षाने १४ जागांवर उमेदवार जाहीर केले. ‘बीआरएस’च्या नेत्यांना पक्षाकडे खेचण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या काही खासदारांना तिकीट दिले.

खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच!
तेलंगणमध्ये यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्येच खरी लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी ‘बीआरएस’ला नऊ जागा मिळाल्या. काँग्रेसला तीन तर भाजप चार आणि ‘एमआयएम’ला एका जागेवर समाधान मानावे लागले. यावेळी मात्र काँग्रेसला ही निवडणूक लाभदायी ठरेल, असे चित्र आहे. ‘बीआरएस’ला सर्वांत कमी जागा मिळतील, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस, ‘बीआरएस’सह राज्यात भाजप हा ताकदीचा पक्ष आहे. केंद्रासह अनेक राज्यांतील सत्ता हाती असलेल्या भाजपसाठी दक्षिणेत कर्नाटकनंतर तेलंगण हे असे राज्य आहे, की जेथून त्यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.

‘बीआरएस’पुढील अडचणी

– नेते, आमदार अन्य पक्षांच्या शोधात
– प्रभावी उमेदवारांची कमतरता
– नेत्यांवर फोन टॅपिंगसह भ्रष्टाचाराचे आरोप
– दिल्लीतील मद्य गैरव्यवहारात के.सी.आर यांची मुलगी के. कविता यांना ‘ईडी’कडून अटक
– फोन टॅपिंगप्रकरणात आतापर्यंत चार पोलिसांना अटक

भाजपसाठी अनुकूल

– ‘इंडिया’ आघाडीचा राज्यात प्रभाव नाही
– काश्­मीरमधील कलम ३७० रद्द करणे, तोंडी तलाक, अयोध्येतील राममंदिर आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हेच मुद्दे महत्त्वाचे
– आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वरंगल, मेहबूबनगर, जहिराबाद, सिकंदराबाद आदी शहरांमध्ये भाजपचा झेंडा पुन्हा फडकण्याची शक्यता
– हैदराबादमध्ये ‘एमआयएम’चे उमेदवार असुदुद्दिन ओवेसी आणि भाजपच्या माधवी लता यांच्यात अटीतटीची लढत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR