26.7 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमुख्य बातम्याअयोध्येत तोबा गर्दी

अयोध्येत तोबा गर्दी

चेंगराचेंगरीची स्थिती, अयोध्येकडे येणा-या सीमा सील

अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येतील मंदिरात सोमवारी रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान बुधवारी रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी रामभक्तांना नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले. पण भाविकांची संख्या मोठी असल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिस आयुक्त, महानिरीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भाविकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाढती गर्दी पाहता अयोध्येकडे येणा-या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. बांबूच्या खांबांसह ट्रॉली बॅरिअर्स लावले आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय वाढली आहे.

दरम्यान, अयोध्येत गर्दी वाढल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेलिकॉप्टरने अयोध्येत दाखल झाले आणि संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन सुरक्षा विभागाला सूचना दिल्या. उद्भवलेल्या स्थितीमुळे योगी यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिस महासंचालक प्रशांत कूमार आणि प्रधान सचिव गृह संजय प्रसाद हेही राममंदिरात पोहोचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी घेतली. प्रचंड गर्दी पाहता इतर जिल्ह्यांतून अयोध्येकडे येणा-या मार्गांवरून वाहने थांबवली जात आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून अत्यावश्यक वाहनेच सोडली जात आहेत. त्यामुळे भाविकांनी जिथपर्यंत गेले, तिथेच थांबण्याची वेळ आली आहे.

अयोध्येत आज सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तितक्याच संख्येने भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत असून, भाविकांना अखंड दर्शन मिळावे, यासाठी स्थानिक प्रशासन सर्व व्यवस्था करत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी ८ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव गृह संजय प्रसाद आणि पोलिस महासंचालक प्रशांत कुमार परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राम मंदिराच्या आत उपस्थित आहेत. या दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसराचे हवाई सर्वेक्षण केले. या गर्दीचे नियोजन न केल्याने योगी आदित्यनाथ यांनी अधिका-यांवर नाराजी व्यक्त केली.

५०० मीटर अंतरावर बॅरिकेटस्
अयोध्येत पाचशे मीटर अंतरावर तीन विभागात बॅरिकेड्स लावून भाविकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, जमावाच्या दबावाखाली गेट तोडले. त्यामुळे अनेक भाविक नव्हे तर पोलिस कर्मचारीही जखमी झाले. भाविकांनी बॅरिकेटिंग ओलांडून आत प्रवेश केल्यावर सकाळी ११.३० च्या आरतीसाठी मंदिरातील दर्शन काही काळ थांबवण्यात आले. मात्र, गर्दी वाढल्याने दर्शन सुरू करण्यात आले.

पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
दुपारी २ च्या सुमारास आतील आणि बाहेरील भाविकांची प्रचंड गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला आणि हवेत लाठीमार केला. यामुळे चेंगराचेंगरीही झाली आणि अनेक लोक घसरून जखमी झाले. गर्दीत अडकलेल्या काही वृद्ध महिलांना पोलिसांनी कसेबसे बाहेर काढले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR