34.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रआज भेंडवळ मांडणी

आज भेंडवळ मांडणी

बुलडाणा : जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी घटमांडणी करण्यात येणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ येथे होणा-या पारंपरिक घटमांडणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेली ३५० वर्षे वाघ परिवार ही घटमांडणी करत आहे. या घटमांडणीच्या दुस-या दिवशी वर्तवलेल्या भाकितांचे महत्त्व अनमोल मानले जाते. यावर्षी युद्ध, महापूर आणि हवामानाची स्थिती कशी असेल? याबाबतचे भाकीत या घटमांडणीत वर्तवले जाणार आहे. याकडे केवळ शेतकरीच नव्हे, तर सामान्य नागरिक आणि प्रशासनाचेही लक्ष लागलेले आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी होणार आहे. वाघ परिवाराने ३५० वर्षांपासून जपलेल्या परंपरेनुसार दुस-या दिवशी म्हणजेच १ मे रोजी सूर्योदयाच्या वेळी या घटामध्ये रात्रभर झालेल्या बदलांवरून भविष्य वर्तवले जाईल. या भाकितामध्ये प्रामुख्याने शेती, पीक, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण आणि राजकीय परिस्थिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर अंदाज व्यक्त केले जातात. भेंडवळच्या वाघ कुटुंबाने सुरू केलेली ही परंपरा आजही त्यांचे वंशज चंद्रभान महाराज वाघ यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे.

मोठी गर्दी होण्याची शक्यता
भेंडवळच्या घटमांडणीत शेती आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित भाकितांबरोबरच नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडींविषयीही अंदाज वर्तवले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून या भाकित अचूक आहेत. लोकांचा या परंपरेवर दृढ विश्वास आहे. त्यामुळेच उद्या संध्याकाळच्या घटमांडणीनंतर १ मे रोजी सूर्योदयापूर्वी होणारे भाकीत ऐकण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष
या घटमांडणीचे भाकीत बहुतांश वेळा खरे ठरते. त्यामुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हा वार्षिक अंदाज नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. यासोबतच, राजकीय भाकित ऐकण्यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी येथे होत असते. यावर्षी बदलत्या हवामानाचा विविध क्षेत्रांवर कसा परिणाम होणार, याबाबतचे भाकीत काय असेल, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मोठे बदल घडणार?
यंदा देशात आणि जगात काय मोठे बदल घडणार आहेत? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे की नाही? कोणत्या भागात महापुराचा धोका आहे? आणि हवामान कसे असेल, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे भेंडवळच्या भाकितातून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या ऐतिहासिक घटमांडणी आणि त्यातून येणा-या भाकितांकडे सर्वांचे डोळे लागलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR