नाशिक : ऐन दीपोत्सवात इतर किराणा साहित्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची दिवाळी काहीशी कडवट झाली आहे. मात्र, अशातही आवक घटलेली असतानाही भाज्यांचे दर घसरल्याने वाढत्या महागाईत अल्पसा दिलासा मिळतो आहे. बाजार समितीत टोमॅटो आणि कांदा वगळता इतर सर्व भाज्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी घसरले आहेत. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत्या काळातही दरांत फारशी वाढ होणार नसल्याची शक्यता भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
गुरुवारपासून (दि. ९) दिवाळीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्ताने किराणा साहित्यासह सर्वच वस्तूंच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून, दरही वाढल्याचे दिसून आले. अशातच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाज्यांचीही आवक घटलेली आहे. असे असतानाही मागील काही दिवसांपासून चढलेले भाज्यांचे दर घसरले आहेत. भाजी बाजारात पालेभाज्यांसह वांगी, भेंडी, हिरवी मिरची सर्वच भाज्यांचे दर घसरल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
भाजी बाजारात इतर सर्वच भाज्यांचे दर घसरलेले असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून गडगडलेल्या टोमॅटोची लाली या आठवड्यातही कायम आहे. मागील आठवड्यापर्यंत ५ रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो आता २५ रुपये किलोवर गेला आहे. याचबरोबर पुढील काही दिवस बाजार समित्या बंद असल्याने कांद्याच्याही दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.