27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्र‘साखळ’मधून घडविला जाणार उद्याचा महाराष्ट्र!

‘साखळ’मधून घडविला जाणार उद्याचा महाराष्ट्र!

काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर असण्याचा प्रश्न येत नाही

इस्लामपूर : विशेष प्रतिनिधी
‘महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे. पक्षाचा देशातील प्रमुख म्हणून सांगतो साखळ गावातून उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हाती महाराष्ट्र उभारण्याची, सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबजदारी टाकणार आहे’, असे स्पष्ट वक्तव्य शरद पवारांनी केले. तात्पर्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी जयंत पाटील यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनविण्याचे संकेत दिले आहेत.

शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिल्याची राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी सांगलीच्या इस्लामपूर येथील सभेत संबंधित वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची पात्रता आहे, असं शरद पवारांनी म्हणणं वावगं नाही’, असं नितीन राऊत यांनी म्हटले आहे. ‘मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोट करण्याचा विषय येत नाही. निकालानंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होईल’, असंही नितीन राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणे किंवा मुख्यमंत्री ठरवणे हे राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या हातात नसून दिल्लीतील हायकमांड याबाबत निर्णय घेते, असे नितीन राऊत यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री पदासाठी प्रमोशनचा विषय येत नाही. त्यांनी असेही म्हटले की, त्यांची पात्रता आहे. त्यांची योग्यता आहे, असे म्हणणे त्यामध्ये काही वावगं नाही. सर्वच पक्ष आपापल्या पक्षाबाबत बोलत असतात. पण सरतेशेवटी काँग्रेस पक्षामध्ये जी भूमिका असते ती काँग्रेसची हायकमांड घेत असते. जेव्हा आम्ही आघाडीत असतो तेव्हा हायकमांड त्या आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करुन, जेव्हा विधानसभेचे सदस्य निवडून येतील त्यावेळी ते निर्णय घेतील, अशी आमच्याकडे प्रथा आहे. मला वाटते त्या दृष्टीकोनातून तो निर्णय होईल. काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर असण्याचा प्रश्न येत नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आमचे केंद्रीय नेते घेतील. तो प्रश्न आमच्याकडे नाही’, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR