मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील टोरेस कंपनीच्या कथित आर्थिक घोटाळ््यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या कंपनीने गुंतवणुकीवर घसघसीत परतावा देण्याचे आश्वासन देऊन लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. हा कथित घोटाळा समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही कंपनी गुंतवणूकदारांना कशा प्रकारे लुटत होती, याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत.
टोरेस ज्वेलरीच्या मुंबईत अनेक ठिकाणी शाखा होत्या. ग्रँट रोड, नवी मुंबई, कल्याण, मीरा रोड अशा मोक्याच्या ठिकाणी या कंपनीने आपल्या शाखा उघडल्या होत्या. मात्र हा घोटाळा समोर आल्यानंतर पोलिसांनी कंपनीतील उच्चपदस्थ अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे या कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कथित घोटाळ््याला कंपनीचे सीईओ तौसीफ रेयाज यांना जबाबदार धरले आहे.
ही कंपनी गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याच्या वेगवेगळ््या ऑफर्स द्यायची. तुम्ही एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या पेंडटवर १० हजार रुपयांची सूट दिली जायची. तसेच गुंतवणुकीवर ६ टक्क्यांनी परतावा देऊ, असे आश्वासन दिले होते. ही कंपनी फेब्रुवारी २०२४ मध्ये चालू झाली होती. पुढील महिन्यात या योजनेला एक वर्षे पूर्ण होणार होते. मात्र त्याआधीच ही फसवणूक झाली आहे.