26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयकठोर निर्णय घ्यावे लागणार

कठोर निर्णय घ्यावे लागणार

हरियाणा-महाराष्ट्रातील पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा केली. निवडणुकीच्या निकालातून धडा घेऊन कठोर निर्णय घ्यावे लागतील असे खरगे यांनी बैठकीत स्पष्ट केले. जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि उणिवा दूर कराव्या लागतील. तीन राज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नसल्याचेही खरगे यांनी म्हटले.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर भाष्य केले. निवडणूक निकालातून आपण ताबडतोब धडा घेऊन संघटनात्मक पातळीवरील आपल्या सर्व कमकुवतपणा आणि उणिवा दूर करणे आवश्यक आहे, हे निकाल आपल्यासाठी संदेश आहेत असे खरगे यांनी म्हटले. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या लोकसभा खासदार प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. पण दोघेही बैठकीच्या मध्येच निघून गेले. त्यामुळे आता याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत.

परस्पर ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील विधाने यामुळे आपले खूप नुकसान झाले आहे. आपण शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे आणि एकसंध राहणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही आणि एकदिलाने निवडणुका लढवणार नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा होणार? प्रत्येकाने शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. काँग्रेस पक्षाचा विजय हा आमचा विजय आणि पक्षाचा पराभव हा आमचा पराभव आहे असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पक्षाच्या ताकदीतच आमची ताकद आहे असेही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले.

आपसोबत जाणार नाही
काँग्रेस सीडब्ल्यूसीच्या बैठकीतून बाहेर पडलेले दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत युती होणार नाही. पक्ष सर्व ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे असे सांगितले. या बैठकीत ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचे खरगे यांनी म्हटले. देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे खरगे म्हणाले.

एकदिलाने लढावे लागणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी हरियाणामध्येही आश्चर्यकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. अनेक राज्यांतील पक्षांतर्गत गटबाजीवरुन खरगे यांनी, जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढणार नाही आणि एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा करायचा? असा सवाल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR