पर्यटन हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे सक्षम माध्यम मानले जाते. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वोच्च सेवा उद्योगांपैकी एक आहे. आजच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करणे ही प्रत्येक देशाची पहिली गरज आहे. आज जगात अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगाभोवती फिरते. भारताच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा ६.२३ टक्के वाटा आहे तर एकूण रोजगारामध्ये ते ८.७८ टक्के योगदान देते. २०२२ मध्ये सुमारे ६२ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने पर्यटन धोरण २०२३ तयार केले असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात पर्यटन उद्योगाचा विकास मोठी भूमिका बजावेल.
र्यटनाला सर्व जगात अगदी प्राचीन काळापासून महत्त्व दिले गेले आहे. अगदी १५व्या, १६व्या शतकात भारत बघायला आलेल्या अनेक दर्यावर्दी पर्यटकांची माहिती आपण इतिहासात वाचलेली आहे. हे पर्यटक जरी व्यापारी संधी शोधण्याकरिता किंवा व्यापार वाढवण्याकरिता आले असले तरी त्यामध्ये भारत देश कसा आहे, इथले लोक कसे आहेत हे बघण्याचे आकर्षण हे देखील त्यामागचे एक कारण होते. आपल्या भारतात अनेक कथांतून तीर्थयात्रेचे संदर्भ दिसून येतात. अगदी अलीकडच्या काळातही तीर्थयात्रा केल्या जातात. यामागे मुख्य उद्देश जरी देवदर्शन हा असला तरी त्यानिमित्ताने केल्या जाणा-या पर्यटनाचा उपयोग नवीन स्थळे, ठिकाणे पाहण्याकरिताही होतो. पर्यटनाचे आकर्षण हे नवीन नक्कीच नाही. भारतातील देवस्थाने बघितली तर असे दिसून येईल आणि असे म्हणता येईल की लोकांना पर्यटनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी चांगल्या अशा पर्यटनाच्या ठिकाणी मुद्दाम देवालये, तीर्थस्थाने बांधली गेली आणि देवदर्शनाच्या निमित्ताने लोकांचे पर्यटन घडले आणि घडते.
मुळात कोणत्याही देशाला आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला पर्यटन आणि पर्यटक हे नेहमीच हवेहवेसे वाटतात. कारण या पर्यटकांमुळे आणि त्यांच्या पर्यटनामुळे अनेक रोजगार उत्पन्न होतात. देशातील हस्तकला, पारंपरिक कलाकुसर, व्यापार यांना चालना मिळते, उत्पन्न मिळते. आतिथ्य उद्योगाला ग्राहक मिळतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशाला परकीय चलन मिळते जे भारतासारख्या देशाला खूप महत्त्वाचे आहे. पर्यटन हे जगातील प्रत्येक माणसाला हवेहवेसे वाटते; किंबहुना ती प्रत्येक माणसाची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती जशी जमेल तशी ही गरज पूर्ण करते. त्यामुळे पर्यटनक्षेत्राला मागणी भरपूर आहे आणि जो ही मागणी योग्य रीतीने शोषण करेल त्याला या व्यवसायात लाभही भरपूर आहे असे म्हणता येईल. भारतात पर्यटनाच्या अफाट संधी आहेत. बर्फाच्छादित पर्वतांपासून ते महासागरात पसरलेल्या बेटांपर्यंत. पर्यटन क्षेत्र विविधतेने नटलेले आहे. भारताला समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळेच पर्यटन उद्योग नवीन अवकाश शोधत आहे. या उद्योगात खासगी क्षेत्राचा ८० टक्के सहभाग आहे, मात्र या अनुकूल वातावरणाबरोबरच सुरक्षा, दक्षता, वाहतूक व्यवस्था आणि स्वस्त वाहतूक सुविधाही आवश्यक आहेत. यासाठी नवीन विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे पर्यटन उद्योगाची व्याप्ती वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा भारतातील पर्यटन वेगाने वाढू लागले आहे.
पर्यटन हे कोणत्याही देशासाठी आर्थिक सुव्यवस्थेचे एक शक्तिशाली माध्यम आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांनी केवळ पर्यटनाच्या आधारावर आपल्या अर्थव्यवस्थांचा भरीव विकास करून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. यासाठी रस्तेसेवा, विमान वाहतूक, जलवाहतूक यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या देशांनी लक्षणीय गुंतवणूक व खर्च केला. आपल्याकडे वाहतुकीच्या सोयीस्कर साधनांच्या अभावामुळे ईशान्येकडील राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडली होती. पण अलीकडील काळात ईशान्येकडील राज्यांबद्दल लोकांची उत्सुकता वाढवली आहे. पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथे पर्यटन क्रांती होऊ शकते आणि परिसरातील लोकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध होऊन जनता सुखी होऊ शकते. पर्यटन हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे सक्षम माध्यम मानले जाते. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वोच्च सेवा उद्योगांपैकी एक आहे. आजच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करणे ही प्रत्येक देशाची पहिली गरज आहे. पर्यटनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था याच उद्योगाभोवती फिरते. युरोपीय देश, किनारपट्टीवरील आफ्रिकन देश, पूर्व आशियाई देश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या पर्यटन उद्योगामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाल्या आहेत. श्रीलंकेसारख्या अनेक देशांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होण्यामागे पर्यटन उद्योग कोसळणे हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.
पर्यटन क्षेत्राच्या विकासामुळे लोकांना रोजगार तर मिळतोच, शिवाय इतर प्रांतातून येणा-या लोकांचे राहणीमान, सभ्यता आणि संस्कृती यांची देवाणघेवाणही सुलभ होते. जागतिक स्तरावर, पर्यटन हे जगातील सर्वांत मोठे कमाईचे क्षेत्र बनले आहे. जागतिक स्तरावर सकल देशांतर्गत उत्पादनात ११ टक्क्यांपर्यंत योगदान पर्यटन क्षेत्राचे आहे. मात्र, भारतातील या क्षेत्राचे योगदान अजूनही केवळ ६.७ टक्के इतकेच आहे. भारताची तुलना इतर देशांशी करायची झाल्यास चीनमध्ये पर्यटनक्षेत्राचे अर्थकारणातील योगदान ८.६ टक्के आहे. श्रीलंकेत ते ८.८ टक्के, इंडोनेशियात ९.२ टक्के, मलेशियात १२.९ टक्के आणि थायलंडमध्ये १३.९ टक्के इतके आहे. याचाच अर्थ भारताचे हे शेजारील देश पर्यटनाबाबत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. भारतात पर्यटन क्षेत्राचा जीडीपीमध्ये ६.२३ टक्के वाटा आहे; तर देशातील एकूण रोजगारामध्ये या क्षेत्राचे योगदान ८.७८ टक्के आहे. २०१४-१५ साली पर्यटन आणि हॉटेल्स यांची एकूण उलाढाल सुमारे २८ लाख कोटी रुपयांच्या आसपास होती. २०२५ सालापर्यंत हीच उलाढाल ५८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. या उद्योगात जवळजवळ २ कोटी मनुष्यबळ गुंतलेले आहे. अर्थातच हा आकडा यापेक्षाही निश्चितच जास्त आहे. कारण या उद्योगामुळे अप्रत्यक्षपणे असंख्य जणांना रोजगार मिळत आहे. २०२२ मध्ये सुमारे ६२ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक आले होते. देशातील धार्मिक स्थळांवरही पर्यटकांची गर्दी असते.
पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन पर्यटन धोरण २०२३ तयार केले आहे. यामुळे भारतातील पर्यटन क्षेत्राला नवे रूप मिळण्यास मदत झाली आहे. केंद्र सरकारने २०३० पर्यंत पर्यटन उद्योगातून ५६ अब्ज परकीय चलन मिळवण्याचे आणि पुढील सात वर्षांत १४० दशलक्ष नोक-या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पर्यटनाला चालना देताना निसर्गाचेही रक्षण करावे लागेल. पर्यटनस्थळांवर कचरा आणि प्रदूषण होणार नाही हेही पाहावे लागेल. पर्यटन वाढवण्यासाठी प्रेक्षणीय स्थळे, निसर्गसौंदर्य, प्राचीन कलाकृती, स्थापत्यकला यांकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यासंदर्भातील माहितीचे आकलन करून घेण्याची वृत्ती विकसित करावी लागेल. देशात परदेशी पर्यटकांना लुटण्याचे किंवा विदेशी महिलांची छेड काढण्याचे प्रकार अभावाने का होईना पण घडत असतात. त्यांना आळा घालण्यासाठीही ठोस पावले उचलावी लागतील. परदेशी पर्यटकांची सुरक्षा हे आमचे ध्येय आहे, असा संदेश जागतिक पटलावर देण्याची जबाबदारी समाजाची आणि शासनाची आहे. तरच विदेशी पर्यटकांना भारतातील सफारी सुरक्षित वाटू शकेल. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात पर्यटन उद्योगाचा विकास मोठी भूमिका बजावेल. यामुळे अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात बळ मिळेल यात शंका नाही.
– शुभांगी बहुलेकर, पर्यटन क्षेत्राच्या अभ्यासक