शिवणी : प्रतिनिधी
किनवट तालूक्यातील सहस्त्रकुंड धबधबा येथे पर्यटकांची गर्र्दी वाढली असून निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याने रूद्ररूप धारण केले. धबधबा पाहण्यासाठी राज्यातून रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार इस्लापूर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने १७ ऑगस्ट रोजी आले होते. त्यांनी पर्यटन स्थळ सहस्त्रकुंड धबधबा येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्यात भरभरून वाहणा-या पैनगंगा नदीच्या धबधब्याचे त्यांनी अवलोकन केले. या वेळी हजारोंच्या संख्येने पर्यटक सहस्त्रकुंड येथे दाखल झाले होते. सहस्त्रकुंड हा निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला धबधबा आहे. येथे येणा-या पर्यटकांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा हुज्जत करू नये. शिस्त राखून निसर्गसौंदयार्चा शांततेने आनंद घ्यावा तसेच स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, ज्यामुळे हे ठिकाण अधिक विकसित होईल असे पोलिस अधीक्षकांनी सागीतले.
या भेटीप्रसंगी मंदिराचे सचिव सतीश वालकीकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे स्वागत करून पर्यटन स्थळाची माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश भोसले, इस्लापूर सरपंच प्रतिनिधी नारायण सिंगारे, बालू शेरे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व जनप्रतिनिधींनीही सहस्त्रकुंड हे सुरक्षित व सुव्यवस्थित पर्यटन केंद्र करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. तसेच, पर्यटकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी येथे आणखी काही पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार असल्याचेही आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले.

