कासगंज : : उत्तर प्रदेशातील कासगंज जिह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पटियाली-दरियावगंज रस्त्यावर भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात पडली. तलावात गेल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. ज्यात बहुसंख्य भाविक समाधिस्थ झाले. या अपघातात आतापर्यंत १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये आठ महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अनेक गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत गोंधळाचे वातावरण आहे. डीएम, एसपी आणि इतर प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. कुटुंबात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे. प्रशासनाने आतापर्यंत १५जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
सीएमओ डॉ. राजीव अग्रवाल यांनी सांगितले की, पटियालीच्या सीएचसीमध्ये सात मुले आणि आठ महिलांना मृत घोषित करण्यात आले आहे. रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणलेल्या इतर जखमींच्या चाचण्या सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिस्थिती अधिक गंभीर आहे.
या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंर्त्यांनी कासगंज जिल्ह्यातील अधिका-यांना अपघातातील जखमींना तातडीने आणि पुरेसे उपचार देण्याचे निर्देश दिले.
त्यांनी बचाव कार्याच्या दृष्टीने जलद प्रतिसाद देण्याचे आदेश दिले आणि कासगंज जिल्ह्यातील पटियाली पोलिस ठाण्यांतर्गत येणा-या जागेवर तातडीने मदतीसाठी संसाधने गोळा करण्याचे आवाहन अधिका-यांना केले.