मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. आरोग्य विभागातील भ्रष्टाचार हा गंभीर विषय आहे. कारण गोरगरीब जनतेच्या जगण्याचा हा विषय आहे. यांनी पक्ष सोडला तो लुटमार करण्यासाठी असे वाटते. कारण ठाकरे सरकारमध्ये अशी संधी नव्हती. ते बेकायदेशीर असले तरी मुख्यमंत्री आहेत म्हणून मी पत्र लिहिले आहे, असे संजय राऊत म्हणाले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
पुण्यातील ससूनमध्ये कारवाई केली तो लहान मोहरा आहे. राज्यातील आरोग्य विषयाचा मुद्दा मी साडेतीन हजार पानांच्या पुराव्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. बदली आणि बढतीचे व्यवहार कसे होतात? ते सगळे पुरावे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. बदल्यांचे पैसे गोळा करण्यासाठी अधिकारी नेमले आहेत. ते पैसे कात्रजच्या कार्यालयात पोहोचवले जातात तिथे कोणाचे ऑफिस आहे हे आपल्याला माहीत आहे. मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात कोणाला अधिक पुरावे हवे असतील तर तुमचा अधिकारी पाठवा. मी आणखी पुरावे देतो. बदल्यांची औक्षण पद्धत काही दिवस आधी वनखात्यात होती. मी राज्यसभा सदस्य म्हणून पत्र लिहिले आहे. जर मला याचे उत्तर आले नाही तर मी यापेक्षा मोठा स्फोट करेल, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.