वेलिंग्टन : चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडमधील ‘व्हाइट आयलंड’ नावाच्या बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यूझीलंडमधील एका कंपनीला दोषी ठरवण्यात आले आहे. ‘वकारी मॅनेजमेंट लिमिटेड’ नावाच्या या कंपनीला वर्कसेफ न्यूझीलंड नियामक संस्थेने १५ लाख न्यूझीलंड डॉलर्स म्हणजेच ७.७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
न्यायाधीश इव्हान्जेलोस थॉमस यांनी बेटावर सहल आयोजित केल्याबद्दल अधिकृत कंपनीवर टीका केली. ते म्हणाले की, हा अपघात एक खूप मोठे अपयश’ होते. नियामकाने केलेली ही कारवाई न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात मोठे प्रकरण आहे. हा अपघात डिसेंबर २०१९ मध्ये झाला होता. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १७ ऑस्ट्रेलियाचे होते तर तीन अमेरिकन नागरिक होते. येथे सहलीसाठी आलेले उर्वरित २५ प्रवासी जखमी झाले होते. या स्फोटाच्या काही आठवड्यांपूर्वी, ज्वालामुखीमध्ये भूगर्भीय हालचाली वाढल्या होत्या. हा न्यूझीलंडमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे.