हैदराबाद : तेलंगणाच्या जोगुलंबा गडवाल जिल्ह्यात एका खासगी बसचा अपघात होऊन बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत बसमधील एका महिला प्रवाशाचा जळून मृत्यू झाला. तर, एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. शनिवारी सकाळी ३ वाजता हैदराबादहून चित्तूरकडे जाणा-या जगन अमेझॉन ट्रॅव्हल्सच्या बसबाबत ही दुर्घटना घडली.
मध्यरात्री बस चालवताना चालकाचा डोळा लागला, तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. या बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. अपघात झाल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यामुळे, बसला आग लागली. अपघातानंतर प्रवाशांनी तात्काळ बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रवासी बसमधून बाहेर आले. मात्र, एका महिला प्रवाशाचा हात अडकल्याने तिला बसमधून बाहेर येता आले नाही. त्यानंतर, बसने मोठा पेट घेतला आणि त्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला.