30.1 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रत्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई : प्रतिनिधी
२०२७ मध्ये नाशिकमध्ये भरणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक जागृत देवस्थान असून दक्षिण भारतातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक आहे. दर १२ वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा, गंगागोदावरी उत्सव, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा, श्रावण महिना प्रदक्षिणा यासारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वरला येत असतात. या पार्श्वभूमीवर त्रिंबक नगरपरिषद क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामांसाठी त्रिंबक नगरपरिषदेला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा ठराव नगर परिषदेने २८ ऑगस्ट २०२४ रोजी मंजूर केला होता. या ठरावानुसार नाशिक विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तवावर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घेत राज्य सरकारला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला ‘अ’ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. या शिफारशीला सरकारने आज मान्यता दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR